By far VT was one of the most prolific writer and had the courage to write on the very facts of the human life cycle with most authority and clarity. He was one of those very few outspoken peoples in our society who never deterred/resisted by any appositions to his writings and thoughts.We all are surely going to miss his character/personality, which is on the verge of extinction in today's obedient world.
Here is a part of his speech, which he gave while receiving the TANVIR Award.
Ref: www.esakal.com, 5/19/08 12:32 PM वैशाख शुध्द १५ सोमवार, 19 May 08.
-- Anil Jangam (19/5/08).
""सर्व दुःखाच्या क्षणांचा मी ऋणी आहे.''
तन्वीर पुरस्कार ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांना मिळाला, त्या वेळी उत्तर देताना तेंडुलकर जे बोलले ते वेगळं बोलले. मनापासून बोलले.
ज्या वेदनेनं - ज्या दुःखानं त्यांना लिहितं केलं त्याविषयी बोलले....त्यांनी केलेलं हे भाषण जसंच्या तसं...
इतकं चांगलं स्वतःविषयी ऐकण्याची मला सवय नाही. तिथं बसून सगळं ऐकताना असं वाटत होतं, की मी इथं नसायलाच हवं होतं. माणसं फार प्रामाणिकपणानं, मनापासून बोलत होती. लेट मी एक्स्प्रेस माय ग्रॅटीट्यूड टू ऑल माय फ्रेंड्स, हू केम फॉर मी, अँड स्पोक सो मेनी गुड थिंग्ज अबाऊट मी. आणि तुमच्याबद्दल, कारण तुम्ही इथं या संख्येनं आलात. आता इथं उल्लेख आहे, की तसं म्हटलं तर मी एक त्रासदायक नाटककार होतो. त्रासदायक लेखकही होतो. तुम्हाला आनंद द्यावा, तुम्हाला काही सुख द्यावं, तुम्हाला काही चांगलं द्यावं, सुंदर काही द्यावं असं मला वाटलं नाही असं नाही. किंबहुना मी स्वतः त्याचा भुकेला राहिलो आहे. मला स्वतःला हे सगळं हवंहवंसं वाटतं; पण माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असेल काय माहीत नाही. मला आयुष्याचे अंधारे कोपरे सारखे भिवलावत आले. मागं वळून बघताना मला सारखं असं दिसतं, की माझ्या आयुष्यात आनंद आला, आजचाही आनंदाचा दिवस आहे; पण ज्यांनी मला घडवलं, ते सगळे आनंदाचे क्षण नव्हते. ते यातनांचे क्षण होते, ते त्रासाचे क्षण होते. ते दुःखाचे क्षण होते.जसे मी आपले सर्वांचे आभार मानले, तसे ते निमित्त असल्यामुळे, ज्या दुःखाच्या क्षणांनी, रागाच्या क्षणांनी, शोकाच्या क्षणांनी, काही वेळा तर वैफल्याच्या क्षणांनी मला आयुष्यात, जो काही मी घडलो ते घडवलं - त्या सगळ्या यातनांच्या दुःखांच्या क्षणांचा मी ऋणी आहे. मी लिहिलं, असं हे सगळी मंडळी म्हणत होती. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, नवीन काही मी हे सांगत नाही; पण हे लिहिलं गेलं. माझ्याकडून हे लिहिलं गेलं. हा विनय नाहीये; पण हे खरंच आहे, की माझ्याकडून हे सर्व लिहिलं गेलंय. अतिशय अशक्य अशा परिस्थितीत मी काही वेळा लिहित गेलो आहे. ज्याची नावं आज घेतली गेली ते त्यातलंही आहे. मला आश्चर्य वाटतं, मला असं वाटतं, की ज्या परिस्थितीत मी हे सगळं लिहित होतो त्यामध्ये एक झपाटा होता. आवेग होता. काही वेळा राग होता; पण विचार होता, असं मला वाटत नाही. एका अर्थानं, एका वेगानं झपाटल्यासारखं मी अनेकदा लिहिलं आहे. ते इतकं टिकावं याचं आश्चर्य वाटतं, ते कुणाला आवडावं याचं आश्चर्य वाटतं. माझ्यासाठी हा एवढा मोठा कार्यक्रम व्हावा, याचंही आश्चर्य वाटतं. मला विचाराल तर आजही इथं उभा राहताना मी छोटा आहे. आणि मला छोटेपण आवडतं. याविषयी मला विषाद नाही. आजच्या या समारंभात एका अर्थानं परका होऊन मी तिथं बसलो होतो; पण मी जेव्हा माणसांच्यात असतो, आजच्या तरुण मुलांच्यात असतो, छोट्या छोट्या मुलांच्यात असतो, तेव्हा ते माझ्या आयुष्यातलं फार मोठं सुख असतं. मी खऱ्या अर्थानं "तिथं' असतो. सौंदर्याचा अनुभव घेताना, निर्मळ आनंदाचा, निर्मळ प्रेमाचा, निरपेक्ष प्रेमाचा अनुभव असताना मी आनंदी असतो. मी त्या आनंदात असतो; परंतु का कुणास ठाऊक, कसं कुणास ठाऊक पण माझ्याकडून जे लिहिलं गेलं ते सगळं वेगळं लिहिलं गेलं. पुन्हा सांगतो त्यात विचार नव्हता.आयुष्याच्या एका मर्यादेपर्यंत मला विचार करायला वेळच झाला नाही. एकतर झपाटल्यासारखा मी लिहित होतो. तसाच झपाटल्यासारखा जगतही होतो. जगण्यामध्ये विचार करायला उसंत अशी वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत मिळाली नाही.त्यामुळे हे सगळं कुणी म्हणतं तेव्हा मला आश्चर्य वाटतं. मी आणखीन एक कृतज्ञता इथं व्यक्त करतो. माझा ईश्वरावर विश्वास नाही. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी मला शंका आहे, माझ्या कारणानं! पण ईश्वर नसेल, तर ज्या शक्तीनं किंवा ज्या अपघातांच्या मालिकांनी मला हे सगळं दिलं, माझ्याकडून हे सगळं लिहून घेतलं त्या सगळ्याविषयी मी अतीव कृतज्ञ आहे. मला असं वाटतं, की हे एका अर्थानं माझं नाही. जे आलं ते या हातानं लिहिलं गेलं, ते पुढे गेलं, याला उत्तम दिग्दर्शक मिळाले, उत्साही दिग्दर्शक मिळाले. माझ्या नाटकासाठी लढाया करणारे, सार्वजनिक जीवनामध्ये दिग्दर्शक आणि नट मला मिळाले. मला असं वाटतं, की जे मी लिहिलं आणि नाटकासारख्या माध्यमांविषयी मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते माझं नाही.मी सांगतो, की मी निमित्त होतो; पण ज्यांनी ते केलं, जीव ओतून केलं, सर्वस्वानं केलं. आणि मी असं सांगतो, की आयुष्याची बाजी लावून त्यासाठी लढून ते केलं. सखाराम बाईंडरचं उदाहरण, मला मनापासून असं वाटतं, की यांच्यामुळे काहीतरी झालं. मी लिहिणारा आहे. मराठीत त्याला लेखक म्हणतात; पण या पलीकडे वरच्या श्रेणीमध्ये मी आहे, असं मनापासून मला वाटत नाही. मी पुष्कळ इतर साहित्य वाचतो. त्या इतर साहित्यात जे, प्रचंड माणसं, प्रचंड लेखन, प्रचंड अनुभूती हे सगळं जिथं मला भेटतं तिथं माझा खरा आकार माझ्या लक्षात सारखा येत असतो. मी त्या सगळ्यांच्या समोर फार छोटा असतो, नम्र असतो.मी असं मनाशी म्हणतो, की यांनी जे बघितलं असेल, अनुभवलं असेल, जगले असतील, यापुढे मी जगलो ते फारसं नाही. इतर कुणापेक्षा कदाचित ते जास्त असेल; पण मी ज्या मोठ्या कलावंतांच्या, दिग्दर्शकांच्या, लेखकांच्या सहवासात आजकाल आहे. मी अतिशय श्रेष्ठ असे चित्रपट बघतो आहे, साहित्य वाचतो आहे. त्यानं आजही वेडा होतोय... आणि मग पुन्हा पुन्हा असं लक्षात येत आहे, की मी केलंय ते फारसं मोठं नाही. त्याचं जे पुढे काही झालं असेल तर त्याचा वाटा ते पुढे नेणाऱ्यांचा! आणि मुख्यतः नाटकासारख्या माध्यमामध्ये प्रेक्षकांचा! एका अर्थानं प्रेक्षकांना जे नको तेच मी देत असतानासुद्धा माझ्यावर रागावून, विनोदाचे प्रयत्न करूनसुद्धा प्रेक्षकांनी माझ्यावर लोभच केला. मला खरंच असं वाटतं, की लोभच केला. प्रेक्षकांची कमतरता "शांतता'नंतरच्या कालखंडात मला कधीही पडली नाही. माणसं येत होती. बघत होती. आता बघितल्यानंतर त्यांची जी काही मतं असतील ती तर त्यांची असणारच. त्यांच्या त्यांच्या समजुतीप्रमाणं ते हे नाटक समजून घेतील. त्यांचा तो हक्क आहे, असं वाटतं. मी जे काही केलं असेल ते म्हणजे माझ्या मनातले अनेक त्रास अनेक आनंद जे कमी होते, अनेक सार्थकाचे क्षण, अनेक दुःखाचे क्षण... हे सगळं मी त्यातून दिलं. मी स्वतः ते कलं असं माझ्या मनात मुळीच येत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो. मी ते कलं नाही.आनंदाच्या समारंभांना यावं असं आजकाल वाटत नाही. शक्यतो मी अशा वेळी नकार देतो; पण आजच्या समारंभाला नकार देणं शक्यच नव्हतं, कारण गेली कित्येक वर्षं ज्यांच्याबरोबर वाढलो, अशा माझ्या दोन माणसांसाठी हा समारंभ होता. डॉक्टर आणि दीपा! नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मी इथं आलो. इथे आहे हे सगळं माझ्यासाठी चाललं आहे, असं एका अर्थानं जरी असलं, तरी माझ्या नजरेसमोर तन्वीर आहे. मनापासून सांगतो, आज हे सगळं जे मला दिलंय ते देण्याऐवजी तन्वीरला जवळ घेता आलं असतं, तर आता वाटतोय त्यापेक्षा कितीतरी पटीत आनंद वाटला असता. अतिशय आनंद झाला असता.... या सगळ्या आनंदामागे त्याची अतिशय दुःखद अशी स्मृती आहे. आणि ती माझ्या मनातून निघणं शक्य नाही.मुळामध्ये मला दुःखच अधिक कळतं. त्या दुःखाशी मी अधिक समरस होतो. त्यामुळे इथला जो आनंद आहे, तो हे सगळं संपलं, की जाताना इथे ठेवून जाईन. मी तन्वीरची आठवण घेऊन जाईन. त्याच्या जाण्यानं डॉक्टरांना आणि दीपाला त्या वेळी जो काही त्रास झाला असेल तो एका अर्थानं तेव्हाही माझा होता, आजही माझा आहे. तो त्रास माझ्या मनाशी राहील. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.